Tuesday, March 2, 2010

पुण्याजवळील दुर्गदर्शन

गेल्या पावसाळ्यातल्या वीकएंडला जास्त वेळच नव्हता. अर्धा दिवस मोकळा सापडला. मग काय… शांत थोडाच बसेन. “पाबे घाट” हे नाव बरेच ऐकले होते. आणि धबधब्यांचे फोटो काढायची खुमखुमी होती. मग घेतल्या बाइक्स आणि मारली एक दुर्गदर्शन (दुरूनच) भ्रमंती.

या दुर्गदर्शन भ्रमंतीसाठीचा मार्ग असा:

पुणे-सिंहगड रोड-खडकवासला धरण-डोणजे फाटा-खानापूर नंतर २०० मीटरवर एक तोरणा-राजगडकडे जाणारा रस्ता दाखवणारा फलक आहे. तिथून डावीकडे वळून घाट चढून जावे. पुढे काही गावे, वाड्यांना मागे टाकून आपण पाबे घाटात पोचतो. हा घाट पुढे चढून गेलात की एक माथ्यावर पाबे खिंड आहे. तेथून तोरणा आणि राजगडाचे विहंगम दृष्य दिसते. तोच रस्ता पुढे उतरुन एका तिठ्यावर येतो. उजवीकडे जाणारा रस्ता आहे तोरणा पायथ्याच्या वेल्हे या गावी जाणारा आणि डाव्या बाजूचा रस्ता जातो राजगडाकडे. तोच पुढे नसरापूरमार्गे मुंबई-बंगळूर हायवेला मिळतो. हा वर्तुळमार्ग एका भेटीत सिंहगड, तोरणा, राजगड, विचित्रगड अशा भुलेश्वर डोंगररांगांतील दुर्गमालिकेचे दर्शन घडवतो. पावसाळ्यात या रस्त्याचे सौंदर्य तर अगदीच जगावेगळे असते. प्रसन्न हिरवाई, डोंगरमाथ्यावर टेकलेले ढग, नागमोडी रस्ता आणि असंख्य धबधबे यांमुळे आठवड्याचा शिणवटा कुठल्या कुठे पळून जाईल.


No comments:

Post a Comment